गुहागर : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सध्या सुरू आहे. कोट्यवधी रुपयाच्या या बंधाऱ्याचे काम नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचे हे कागदावर लिहिले असले तरी प्रत्यक्षात काम करताना यावर घेतल्या गेलेल्या तक्रारीमुळे सध्या गुहागर समुद्र चौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले आहे. परिणामी, गुहागर समुद्रकिनाऱ्याचे विद्रुपीकरण होत आहे.
गुहागर शहराला सहा किलोमीटरची समुद्र चौपाटी लाभली आहे. या चौपाटीवर सीआखोडमुळे अनेक कामे पाडण्यात आली. तर सध्या सुरू असलेल्या कामांवर घेण्यात येत असलेल्या आक्षेपामुळे बंधाऱ्यात अर्थकारणाचे राजकारण सुरु असल्याचा सूर उमटत आहेत. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन, तर असगोलीत एक असे तीन बंधाऱ्याचे काम सुरू आहे. गुहागर पोलिस परेड मैदानामागील असलेला ३८० मीटरचा बंधारा प्रत्यक्षात बजेटमुळे २८६ मीटरवर आला आहे. यामुळे बंधाऱ्याच्या निर्धारित कामाव्यतिरिक्त काम करण्याची मानसिकता संबंधित ठेकेदाराची नाही. दुसरा बंधारा खालचापाट ते छत्रपती शिवाजी चौक आणि खालचापाट ते बाजारपेठ असा विभागला गेला आहे.
सदर बंधारा नक्षत्रवन येथून न घेतल्याने खाडीचे पाणी आतमध्ये येणारा मार्ग बंद होत असल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, येथील बंधाऱ्याचे काम बंद आहे. समुद्रचौपाटीवर काळ्या दगडांच्या मांडणीमुळे चौपाटीचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे, शहराच्या मुख्य नाक्यापासून समुद्र चौपाटीवर जाणाऱ्या मार्गावरील पेव्हर ब्लॉकचे नुकसान झाल्याने काहींनी तक्रार केली आहे.
असगोली बंधाऱ्याबाबत हे वादाचे मुद्दे
असगोली बंधारा कामाचे नाव एक प्रत्यक्षातील काम वेगळे
पूर्वीच्या संरक्षक बंधाऱ्याचे काळे दगड वापरून काम सुरू
असगोली ते पाचमाड असे कामाचे नाव भूमिपूजनही झाले
प्रत्यक्षात काम झाले ते असगोली मारुतीमंदिर या दिशेने
दुसऱ्या बंधाऱ्याबाबत गोंधळाची स्थिती
गुहागर शहर बाजारपेठेसमोरील एका बाजूला २८७ मीटरचा, तर दुसऱ्या बाजूला १०५ मीटरचे दोन बंधारे आहेत. ज्याचे बजेट प्रत्येकी एक कोटीपर्यंत असून, ते अर्धवट आहेत. २८७ मीटरच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण होत आले आहे; परंतु उर्वरित १०५ मीटरचे दोन बंधारे; मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. २०१६ मधील कामाच्या मंजुरीमधील खालचापाट ते छत्रपती शिवाजी चौक हे कार्यक्षेत्र नक्की कोणते पकडणार तर खालचापाट ते बाजारपेठ हे क्षेत्र नक्की कोठून ते कुठपर्यंत, असा सवाल निर्माण होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 20/May/2025














