रत्नागिरी : मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, तालुक्याच्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच दोन एनडीआरएफच्या तुकड्यांचीही मागणी शासनाकडे केली आहे. वाशिष्ठी, शिवनदी, जगबुडी, नारंगी नद्यांमधील गाळ काढण्यात आला असून, यंदा किनारी भागांना पुरापासून संरक्षण मिळणार आहे. दरडप्रवण, पूरप्रवण क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत सूचना प्रसारणासाठी ४०५ ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली असून, ३०० प्रशिक्षित आपदामित्रांची नियुक्ती केली आहे.
मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांनी आराखडा सादर केला. जिल्ह्यातील पूरप्रभावित भाग, गावे, लोकसंख्या व आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे स्थलांतर करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी रत्नागिरी पाटबंधारे मंडळ, पाटबंधारे बांधकाम विभाग, चिपळूण येथे पावसाळा कालावधीत पूरनियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.
पूर येण्याची शक्यता असल्यास आगावू सूचना देण्यासाठी यंत्रणा सज्ज असून, दरड व पूरप्रवण भागातील नागरिकांना स्थलांतरासाठी शाळा, महाविद्यालये, समाजमंदिरे, ग्रामपंचायत इमारती यांची गावनिहाय यादी तयार केली आहे.
तालुकास्तरावर मॉन्सूनपूर्व तयारी बैठका घेऊन नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चिपळूण व खेड येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन एनडीआरएफ पथकांची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. दरडप्रवण घाटात आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 20/May/2025














