Coronavirus : मुंबईत कोरोनाचे 53 रुग्ण

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सोमवारी एकाही नव्या कोव्हिड रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला मुंबई महापालिका अंतर्गत एकूण 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकही कोरोना बाधित रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड-19 रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच रूग्णांसाठी मुंबई महानगरपालिका रूग्णालयांमध्ये विशेष खाटांची आणि विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोविड आजाराचे रुग्ण अत्यंत कमी प्रमाणात अधून मधुन आढळून येतात. मागील काही दिवसांत सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळले आहे.

कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य खाते सतत लक्ष ठेवून आहे. जानेवारी 2025 ते एप्रिल 2025 पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूपच कमी आढळून आली आहे. परंतु मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येत आहेत. या बाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

कोविड 19 साठी महानगरपालिकेची सुविधा

मुंबई महानगरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे. सेव्हन हिल्स (Seven Hill) रुग्णालयामध्ये 20 खाट (MICU), 20 खाटा मुले व गरोदर स्त्रियांसाठी, 60 सामान्य खाटा तयार ठेवल्या आहेत. तसेच कस्तुरबा रुग्णालय येथे 2 अतिदक्षता (ICU) खाटा व 10 खाटांचा वॉर्ड उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास सदर क्षमता त्वरित वाढविण्यात येईल.

कोविड 19 लक्षणे

कोविड-19 च्या सामान्य लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.

उपचार कसे करायचे?

वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या (फॅमिली) डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 20-05-2025