राजापूर : तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजापूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा देणारा महत्त्वाचा वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये तालुक्यातील सुमारे दीड लाख लोकसंख्येचे आरोग्य सांभाळले जाणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेली अनेक वर्षे राजापूर हायस्कूलसमोरच्या जागेमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालय कार्यरत होते. त्यानंतर १७ वर्षांपूर्वी सुसज्ज नवीन इमारत बांधल्यानंतर या नव्या इमारतीमध्ये राजापूर ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. या नव्या इमारतीमध्ये दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. वर्षांनुवर्षे राहिलेल्या रिक्त जागांमुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी असून नसल्यासारखे झाले आहे.
रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी व अन्य विविध संवर्गातील एकूण २८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ २१ पदे भरलेली असून, ७ पदे रिक्त आहेत. सद्यःस्थितीमध्ये या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षकांव्यतिरिक्त एक वैद्यकीय अधिकारीपद भरलेले आहे. भरण्यात आलेले वैद्यकीय अधिकारीपद हे तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्यांच्या करारावर भरलेले आहे.
याचबरोबर कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहायक, सफाई कामगार, दंतचिकित्सक वर्ग-२ ही पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. या रुग्णालयामध्ये दैनंदिन सुमारे १०० हून अधिक बाह्यरुग्ण तपासले जातात. त्याचवेळी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. वैद्यकीय अधिकारी पदासह अन्य विविध कर्मचारी पदे रिक्त आहेत.
एमबीबीएस डॉक्टरही
एखाद्या रुग्णावरील महत्वपूर्ण शस्त्रक्रिया, शवविच्छेदन करणे, सर्पदंशचे निदान आदींसाठी रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरची आवश्यकता असते. रुग्णालयामध्ये एमबीबीएस डॉक्टरांची आवश्यकता असताना वैद्यकीय अधीक्षकांव्यतिरिक्त भरण्यात आलेले एमबीबीएस डॉक्टरचे पद तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे अकरा महिन्यांच्या करारावर भरण्यात आले आहे. या ठिकाणी विविध आजारांसह अपघातग्रस्त रुग्ण सातत्याने दाखल होत असतात. पावसाळी हंगामामध्ये संर्पदंशाच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 20/May/2025














