दापोली : हर्णे बंदरात म्हाकूळ, बिलजा, कोळंबीचे दर घसरले

दापोली : तालुक्यातील हर्णे बंदरात सध्या बिलजा, कोळंबी किंवा म्हाकूळ मासळीची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. सुरुवातीला सप्टेंबरच्याआधी १ ऑगस्टपासून सुरू झालेल्या हंगामामध्ये बऱ्यापैकी मासळी मिळाली होती; परंतु अवैधरीत्या सुरू असलेली घुसखोरी, मासेमारी, वातावरणातील बदल यामुळे मासळीची आवकच घटली. आता शेवटीशेवटी हंगाम संपता संपता मासळी मिळू लागली तर व्यापाऱ्यांकडून दरच कमी झाला असल्याने मिळालेल्या मासळीची विक्री करून खर्चदेखील सुटणे कठीण झाले आहे.

सध्या बंदरामध्ये म्हाकूळ, कोळंबी, बिलजा आदी प्रकारची मासळी बऱ्यापैकी मिळत आहे. बिलजा ही मासळी दोन व तीन सिलिंडरच्या नौकांना मिळत आहे. सहा सिलिंडर नौकांना कोळंबी, म्हाकूळ यासारखी मासळी जास्तीची मिळत आहे. यावेळी मिळणाऱ्या मासळीचे दर घटले आहेत. ज्यावेळी मासळी भरपूर प्रमाणात येते त्यावेळी एका मासळीचे वजनदेखील बघितले जाते. वजन जास्त असेल तर दर जास्त आणि वजनाला कमी असेल तर दर कमी, अशी येथील व्यापाऱ्यांची खरेदी करतानाची पद्धत आहे.

सध्या मिळत असलेल्या बिलजा, कोळंबी किंवा म्हाकूळ या मासळीचा आकार व वजन तसे कमी असल्याने लिलावात भाव कमीच मिळत आहे. बिलजा मासळीचा काही महिन्यांपूर्वी प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत भाव मिळणाऱ्या विलजी माशाचा दर आता केवळ २५ रुपये, कोळंबी गेल्या महिन्यात १३० पर्यंत गेलेला भाव आता ७० ते ८० रुपये, तर म्हाकुळचा गेल्या महिन्यात ३१० पर्यंत गेलेला भाव आता २०० रुपये इतका खाली आल्याने खर्च सुटत नाही. एका नौकेला जेमतेम ४ ते ५ टप मासळी मिळते. अशा एकाच दिवशी जर १५ ते २० नौकांचा माल एकाच दिवशी आला तर माल बंपर असा दिसतो आणि मग व्यापारी मासळीचा दर घसरवतात, असे मच्छीमारांनी सांगितले.

एलईडी, पर्ससीननेटचा फटका
मासेमारीसाठी आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ३१ मेपर्यंतच मासेमारी करता येणार असल्याने पुरेशी मासळी मिळत नसल्याची चिंता मच्छीमारांना आहे. एलईडी आणि पर्ससीननेट मासेमारी करणाऱ्या नौकांचा पारंपरिक मच्छीमारांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत.

मासळीचे जसे वजन आणि आकार असेल त्याप्रमाणे येथील व्यापारी दर आकारतात. मी माझी कोळंबी विक्री केली असता माझ्या कोळंबीला ८० रुपयांप्रमाणे दर मिळाला. या बंदरात ठराविक व्यापारी असल्याने व्यापारी जो दर देतील त्या दरात समाधान मानावे लागते. काही वेळेस भरपूर मासळी बघून देखील व्यापारी दर उतरवतात. – नारायण रघुवीर, मच्छीमार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 20/May/2025