रत्नागिरी पालिका ठेकेदाराचे तीन कोटी देणे?

रत्नागिरी : शीळ धरण ते जॅकवेल आणि पानवल धरण ते नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचा ४५० मीटरचा पॅच असे सुमारे तीन कोटी ४५ लाखांच्या कामाला अखेर सुरुवात झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी रखडलेल्या कामाबाबत ठेकेदार कंपनीला सुनावल्यानंतर काम हाती घेण्यात आले आहे; परंतु ठेकेदार कंपनीच्या म्हणण्यानुसार पालिकाच ठेकेदार कंपनीचे ३ कोटी ३५ लाख रुपये देणे आहे.

या कामाबाबत ठेकेदार कंपनीने पालिकेवरच आरोप केला आहे. रत्नागिरी शहर पाणीपुरवठा योजनेचे पहिल्या टप्प्यातील थकीत बिलातील जीएसटीची रक्कम १ कोटी ७६ लाख व बिलापोटीचे ७४ लाख, असे एकूण २ कोटी ५० लाख रुपये पालिकेकडे दोन वर्षापासून थकीत आहेत. तसेच शहर पाणीपुरवठा योजनेच्या शीळ धरण ते जॅकवेलदरम्यान कामाचे ८५ लाख रुपयांचे बिल सप्टेंबर २०२४ ला पालिकेला पाठवले आहे. अद्याप ते देयक आम्हास अप्राप्त झालेले नाही. अशाप्रकारे पालिका आम्हास सुमारे ३ कोटी ३५ लाख रुपये देणे आहे. असा दावा ठेकेदार कंपनीने केला आहे.

शीळ जॅकवेल कोसळल्यामुळे तात्पुरता पर्याय म्हणून फ्लोटिंग पंप बसवण्यात आले. सुधारित पाणीयोजनेमध्ये शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरच्या पाईपलाईनचा समावेश आहे; परंतु, वर्ष झाले, तरी ही पाईपलाईन टाकण्याच्यादृष्टने अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत.

आता पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली, तर शीळ नदीवरील फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसे झाले, तर ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीप्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत नैसर्गिक उताराने पाणी येते. पालिकेने सुमारे साडेसहाशे मीटरची ही पाईपलाइन वेळाच टाकली असती, तर पालिकते बिलापोटीचे लाखो रुपये वाचले असते. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे काम सुरू केले आणि पाईपलाईन वाहून जाण्याची नामुष्की आली. त्यानंतर या उन्हाळ्यात ही पाईपलाईन टाकली जाईल, असे अपेक्षित होते; परंतु त्यालाही अजून मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर पालकमंत्र्यांनी ठेकेदाराची आणि पालिकेची कानउघाडणी केल्यानंतर कामाला सुरवात झाली आहे. शीळ नदीत चर मारून ही पाईपलाईन टाकण्यात येत आहे. नैसर्गिक उताराने शिळ धरणाचे पाणी जॅकवेलमध्ये येईल. त्यामुळे फ्लोटिंग पंपाच्या बिलाचा पालिकेवरील आर्थिक भार कमी होईल.

दोन कामांचे सुमारे तीन कोटी ३५ लाख रुपये देणे आहे. असे ठेकेदार कंपनीचे म्हणणे आहे. मी आताच मुख्याधिकारी पदाचा कार्यभार घेतला आहे. त्यामुळे पूर्ण कागदपत्रांची तपासणी करून कंपनीचे हे देणे दिले जाईल- वैभव गारवे, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 20/May/2025