खेड : तालुक्यातील कुडोशी जांभुळवाडी येथे १८ मे २०२५ रोजी दुपारी ४:३५ वाजता एक भीषण मोटार अपघात घडला. या अपघातात योगेश मनोहर मोहीते (वय ४२, रा. उन्नती कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, मूळ रा. चाकाळे कोळकेवाडी, ता. खेड) गंभीर जखमी झाले. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी प्रदीप गावड्डु पाटील (वय ३५, रा. शिवतर रोड, भडगाव उसरेवाडी, ता. खेड) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गु.र.नं. १५४/२०२५).
फिर्यादी योगेश मोहीते हे त्यांच्या मेव्हण्याची होंडा अॅक्टीव्हा दुचाकी (क्र. एम.एच.१५ जे.एफ. ६९२७) चालवत खेड ते देवघर बौद्धवाडी येथे जात होते. कुडोशी जांभुळवाडी येथे त्यांच्या समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो वाहनाने (क्र. एम.एच.०८ टी.सी.-८१०) जोरदार धडक दिली. फिर्यादीनुसार, आरोपी चालक प्रदीप पाटील याने वाहन भरधाव वेगाने आणि हयगयीने वेड्यावाकड्या पद्धतीने चालवले. यामुळे वाहन पूर्णपणे रॉंग साइडला येऊन फिर्यादीच्या दुचाकीला धडकले. या धडकेत फिर्यादी वाहनासह फरफटत रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खड्ड्यात पडले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.
हा अपघात १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:१८ वाजता खेड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तपास सुरू केला असून, रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि बेजबाबदार वाहन चालवण्याबाबत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 20-05-2025














