चिपळूण : कालुस्ते-खोपड पुलाचे काम पूर्ण

चिपळूण : तालुक्यातील कोंढे-करंबवणे मार्गावर कालुस्ते-खोपड पुलाचे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरीही उर्वरीत कामे अर्धवट ठेवली आहेत. पावसाळा जवळ येऊन ठेपला आहे. अशातच पुलाच्या बांधकामावेळी नदीत भराव टाकून काढलेला पर्यायी रस्ता अजूनही तसाच ठेवलेला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरणही न झाल्याने बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणाबाबत ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

चिपळूण तालुक्याच्या खाडीपट्टा विभागात कोंढे करंबवणे हा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर कोंढे, शिरळ, खोपड, कालुस्ते, भिले, केतकी, करंबवणे आदी गावे येतात. या रस्त्यावरून धामेली मार्गे कापरे, बिवली, मालदोली, ग्राग्रई आदी अनेक गावांमध्ये वाहतूक होत असते. त्यामुळे खाडीपट्ट्यातील दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा आहे.

या मार्गावरील खोपड-कालुस्ते नदीवरील पूल जुना झाल्याने आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्पातून एक कोटीहून अधिक निधी या पुलाच्या पुनर्बाधणासाठी उपलब्ध केला. गतवर्षी पावसाळ्यानंतर या पुलाचे काम हाती घेऊन वेळेत पूल सबंधित ठेकेदारांने बांधला. त्यानंतर मात्र त्याच्या उर्वरित कामांकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही.

सद्यःस्थितीत या पुलाच्या दोन्ही बाजूचे डांबरीकरण रखडलेले असल्याने एखादे वाहन गेल्यानंतर धुरळ्याचा त्रास अन्य वाहनांना होत आहे. पूल बांधकामावेळी नदीत आणि शेजारील शेतात मातीचा भराव टाकून पर्यायी वाहतुकीसाठी रस्ता करण्यात आला. मात्र, अजूनही हा माता भराव काढून टाकलेला नाही.

पावसाळा जवळ येऊन ठेपलेला असल्याने नदीतील माती भराव तत्काळ काढून टाकणे आणि पुलाचे अर्धवट राहिलेले डांबरीकरण तत्काळ करणे गरजेचे बनले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार यांच्याशी स्थानिकानी वारंवार संपर्क साधूनही कामे होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पुलाचे काम पूर्ण काम दोन महिने उलटले, तरीही कामे अर्धवट राहिली आहेत. बांधकाम विभागात चौकशी केल्यानंतर ठेकेदार काम करीत नसल्याची उत्तरे दिली जात आहेत. नदीतील भराव अजून तसाच आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर अपूर्ण कामे पूर्ण करणार का? ठेकेदार आणि बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा या सर्वाला कारणीभूत आहे- रामकृष्ण कदम, माजी सरपंच, कालुस्ते ग्रामपंचायत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 20/May/2025