पावस : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पावस बसस्थानकामध्ये बांधण्यात आलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. शौचालयाच्या टाकीचे बांधकाम चांगल्या प्रतीचे नसल्याने प्रवासी जनतेला हा त्रास सहन करावा लागत आहे. हे शौचालय तुंबल्यामुळे आता याला कुलूप लावण्यात आले आहे.
पावस बसस्थानकाच्या आवारामध्ये शौचालय बांधण्यात आले; परंतु कालांतराने शौचालयाची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पावस ग्रामपंचायतीने दीड वर्षापूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत २ लाख ६७ हजार रुपये खर्च करून सुसज्ज शौचालय बांधण्यात आले; परंतु शौचालयाच्या टाकीचे बांधकाम योग्य तन्हेने न केल्यामुळे साठवण टाकीमध्ये अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे कमी कालावधीमध्ये शौचालयाची टाकी भरू लागली. ग्रामपंचायतीने परिवहन खात्याकडे शौचालय वर्ग केल्यानंतर परिवहन खात्याने स्वच्छतेची हमी घेतली.
दररोज परिसराची स्वच्छता केली जात होती; परंतु साठवण टाकी भरत असल्यामुळे त्या ठिकाणी शोषखड्डा नसल्याने प्रत्येक वेळी टाकीतून पाणी बाहेर पडत आहे. ते उपसण्यासाठी परिवहन खात्याला प्रत्येक वेळी बारा ते पंधरा हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. वारंवार हा खर्च परिवहन खात्याला परवडत नसल्याने शौचालय तुंबत असून, दुर्गंधी बाहेर पसरत आहे.
या संदर्भात मिलिंद शिंदे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेने शौचालय बांधण्यात आले; परंतु त्यानंतर त्याची निगा राखणे हे प्रवासी जनतेच्या दृष्टीने परिवहन खात्याचे काम आहे. या संदर्भात वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांना त्यांच्या पावस दौऱ्यात ही गोष्ट लक्षात आणून दिली. त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 21/May/2025














