‘आधारशिला बालवाटिका’ अभ्यासक्रम २०२५-२६ पासून अंगणवाड्यांमध्ये होणार लागू

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वयोगटातील बालकांसाठी ‘आधारशिला बालवाटिका’ अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. या अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यापूर्वीच शाळेसाठी तयार करणे हा आहे.

राज्यात सध्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६३१ अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यामध्ये सुमारे ३० लाख बालकांना नवचेतना, जादुई पिटारा, ई-पिटारा यांसारख्या शिक्षण साहित्याचा वापर करून हे शिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरुवातीला निवडक अंगणवाड्यांमध्ये प्रायोगिक स्वरूपात होईल. कृतीपुस्तिका, प्रगती पुस्तिका व पूरक साहित्याचा वापर केला जाईल. वर्षभरानंतर मूल्यमापन करून अंतिम निर्णय घेतला जाईल.

अंगणवाडी सेविकांसाठी खेळाधारित शिक्षणावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन शालेय शिक्षण व महिला व बाल विकास विभाग यांच्या सहकार्याने केले जाईल. बारावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र, तर इतर अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स राबवला जाणार आहे. हे प्रशिक्षण एससीईआरटीच्या समन्वयाने दिले जाईल. यासाठी अंगणवाडी सेविकांची माहिती महिला व बाल विकास विभागाने संबंधित संस्थेला द्यावी असे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 21-05-2025