रत्नागिरी : ‘टिळक आळी मंडळा’चे शतक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून विविध कार्यक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीतील टिळकआळी गणेशोत्सव मंडळाचे पुढचे वर्ष हे १००वे अर्थात शतक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त टिळकआळी गणेशोत्सव मंडळातर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दसऱ्याला म्हणजेच शनिवारपासून (ता. १२) या कार्यक्रमांची सुरू होणार आहे.

श्री मारुती गणपती पिंपळपार देवस्थान (पार) येथे दर शनिवारी भजन आयोजित केले जाते. त्याची सुरुवात १९१८ ला दसऱ्याला झाली होती. त्याला आता १०५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे त्या दिवसाचे औचित्य साधून शनिवारपासून हे शतकमहोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. या वर्षानिमित्ताने मंडळाने अथर्वशीर्षाच्या लक्ष आवर्तनाचा संकल्प सोडला आहे.

१३ ला या लक्ष आवर्तनाला सुरुवात होईल. रोज सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ४ ते ६ अशी ही आवर्तने होणार आहेत. १३ ला संध्याकाळी ४ वा. टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्ते व सदस्यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिभा प्रभुदेसाई अथर्वशीर्ष या विषयावर विचार मांडणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत केळ्ये-मजगाव येथील उदय मेस्त्री (श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळये मजगाव) यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल. या संपूर्ण वर्षात टिळक आळी गणेशोत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम राबवले जाणार आहेत. त्यात बुद्धिबळ, कॅरम, ब्रीज अशा विविध स्पर्धाही घेण्यात येणार असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:11 PM 11/Oct/2024