कुणबी समाजातील पोटजाती इतर मागास प्रवर्गात, श्रेयाचा अधिकार पुढाऱ्यांना नाही : रवींद्र नागरेकर

राजापूर : कुणबी समाजाची मातृसंस्था असलेल्या कुणबी समाजोन्नती संघाने पाठपुरावा केला. त्यामुळे कुणबी समाजातील पोटजातींचा इतर मागास प्रवर्गामध्ये समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचे श्रेय कुणबी समाजोन्नती संघाला असून जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींना याचे श्रेय घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा दावा कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे कार्यकारिणी सदस्य रवींद्र नागरेकर यांनी केला.

तिलोरी कुणबी, ति. कुणबी आणि तिल्लोरी कुणबी असा उल्लेख असणाऱ्या पोटजातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश नसल्याने जात पडताळणी करताना कुणबी बांधवांना अडचणी येत होत्या. याबाबत कुणबी समाजोन्नती संघाचे नेते चंद्रकांत वावकर व अन्य मंडळींनी बाचा परिपूर्ण अभ्यास करून शासनाला डाटा सादर केला होता. संपूर्ण कोकणात ७० हजाराहून अधिक फॉर्मचा डाटा समाजकल्याण आयोगाकडे सादर केला. कुणबी समाजोन्नती संघाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी रात्रीचा दिवस करून हा डाटा गोळा करून शासनाला सादर केला. परिपूर्ण पुराव्यांच्या आधारे समाजकल्याण आयोगाने त्याला मान्यता दिली आणि राज्य शासनाला याबाबतची भूमिका घ्यावी लागली, हे होणारच होते.

यामध्ये कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा काडीमात्र संबध नाही; मात्र, निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजी करून याचे श्रेय घेत कुणबी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही राजकीय पुढारी करत असल्याचा आरोप नागरेकर यांनी केला. निवडणुका जवळ आल्या असताना आताच कशी यांना कुणबी समाजाची आठवण होत आहे? ओबीसीमध्ये समावेश नसल्याने अनेक कुणबी बांधवांना दाखले मिळत नव्हते तेव्हा बॅनरबाजी करणारे हे लोकप्रतिनिधी कुठे होते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

निवडणुका आल्या की आठवण
कोणत्याही निवडणुका आल्या की कुणबी समाजाची आठवण होणाऱ्या बेगडी राजकीय पुढाऱ्यांपासून कुणबी समाजबांधवांनी सावध राहावे, असे आवाहन एका प्रसिद्धीपत्राद्वारे संघ पदाधिकाऱ्यांनी केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय झालेला असताना राजापूर आणि लांजामध्येच याचे बॅनर कशासाठी ? कुणबी समाजबांधवांनी या बेगडी पुढाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 11/Oct/2024