रत्नागिरी : तारांगण, थ्रीडी मल्टिमीडियातून ४२ लाख ६० हजाराचे उत्पन्न

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या थ्रीडी मल्टिमीडिया आणि तारांगणामुळे पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागला आहे. तारागंणाने आतापर्यंत ४० लाख रुपये तर थ्रीडी मल्टिमीडियाने, तर २ लाख ६० हजार रुपये पालिकेला मिळवून दिले आहेत.

रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे अत्यावश्यक बनले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकायनि पालिकेने विकासात्मक कामातून आपली पुढील वाटचाल सुरू केली आहे. तारांगण हा त्यातील एक टप्पा गेल्या २२ डिसेंबरपासून कार्यान्वित झाला. तारांगणला २२ डिसेंबरपासून ३० हजार ३७३ जणांनी भेट दिली आहे. तारांगणातील एका शोसाठी लहान मुलांना १०० रुपये, तर प्रौढांना १५० रुपये तिकीट आहेत. यातून नगर पालिकेला ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टिमीडिया १८ मार्चपासून प्रेक्षकांसाठी खुला झाला आहे. येथे १५ वर्षांखालील लहान मुलांना २० रुपये, तर त्यावरील प्रेक्षकांना ५० रुपये दराने तिकीट विकले जाते. आतापर्यंत ५ हजार ५०० जणांनी या मल्टिमीडियाचा शो पाहिला आहे. त्यातून पालिकेला २ लाख ६० हजार इतके उत्पन्न मिळाले आहे.

उत्पन्नवाढीसाठी पालिकेने भाजीमंडई आणि व्यापारी संकुल उभारण्याचाही संकल्प केला आहे. नवीन आणि जुन्या भाजीमार्केटच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले असून, या इमारतीमध्ये व्यापारी गाळेसुद्धा आहेत.

पेठकिल्ला येथील शिवसृष्टीच्या तिकीट विक्रीतूनही पालिकेला उत्पन्न मिळत आहे. रत्नागिरी शहरात मोठमोठी विकासकामे झाली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:47 PM 23/May/2025