रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागात पाणी भरणे, दरड कोसळणे, पूर येणे आदी घटना घडतात. जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील ५० गावे पूरप्रवण गावे म्हणुन ओळखली जातात. पावसाळ्यात येणाऱ्या विविध आपत्तींच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मान्सूनपूर्व तयारी केली असून सर्व तालुक्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार आहेत.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मान्सूनपूर्व तयारीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत सर्व विभागांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या असून २४ तास अर्लट राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष २५ मेपासून २४ तास कार्यरत रहाणार आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षही सदैव कार्यरत आहे.
सर्व तालुके, नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये शोध व बचाव साहित्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण झाले आहे. खेड आणि चिपळूण याठिकाणी एनडीआरएफ पथकाची मागणी करण्यात आली आहे. आपत्कालीन मदतीसाठी ३०० आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. आवश्यक त्या खबरदारीच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
धुवाँधार पावसात या ठिकाणांवर जाणे टाळा
पाऊस पडताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित होतात. नद्या, धरणे यात पाणी साठते. मात्र, या ठिकाणी बुडण्याचा धोका असल्याने जाणे टाळा.
जिल्ह्यात किती ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा ?
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि वखार महामंडळ तसेच सर्व मोबाईल टॉवरवर वीज अटकाव यंत्रणा कार्यरत आहे.
वीज कोसळण्यापासून बचावासाठी ‘दामिनी’ अॅप इन्स्टॉल करा
वीज पडण्यापुर्वी दहा मिनिटे आधी दामिनी या अॅपवर त्याची सुचना कळते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी जाता येते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी हे अॅप मोबाईलवर इन्स्टॉल करणे गरजेचे आहे.
५० गावे
पूरप्रवण म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तर चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, खेड आणि रत्नागिरी हे तालुके पूरप्रवण तालुके म्हणून ओळखले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:54 PM 22/May/2025














