चिपळूण : चिपळूण शहर आणि परिसरात सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात शहरातील शंकरवाडी मार्गावरील एका घरावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मुनावर आयुब नाईक आणि अलताफ आयुब नाईक यांच्या घराचे सुमारे दीड लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
दीर्घकाळानंतर चिपळूणला सोमवारी सायंकाळनंतर अवकाळी पावसाने झोडपले. रात्री पावणेदहाच्या सुमारास वादळी वारा आणि पाऊस सुरू असतानाच विजांच्या कडकडाटात शंकरवाडी येथील घरावर वीज कोसळली. मुनावर नाईक आणि आयुब नाईक यांचे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी घराबाहेर पडण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्या घरावर वीज पडली. दैव बलवत्तर म्हणून हे कुटुंब बचावले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेत घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. घरावरील पाण्याच्या साठवणुकीची टाकी फुटली असून, कौलेही फुटली आहेत. बोअरवेल, सीसीटीव्ही यंत्रणा, इन्व्हर्टर, वायफाय, आदी सर्व विद्युत यंत्रणा खराब झाल्या आहेत. महसूलच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वीज पडल्यानंतर मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला, त्यामुळे काही काळ नेमके काय झाले हे कोणालाच कळले नाही. घटनेनंतर रात्री येथे लोकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नाईक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 22/May/2025














