रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाचे रत्नागिरीत सुरू असलेल्या संथ कामाचा फटका रत्नागिरी शहराच्या प्रवेशद्वारावरील साळवीस्टॉप येथे वाहनचालकांना बसत आहे. बुधवारी (ता. २१) सायंकाळी मुसळधार पावसात तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनचालकांची रखडपट्टी झाली. एकाच मार्गान दोन्ही बाजूंची वाहने ये-जा करत असल्याने हा गोंधळ उडाला आहे.
काँक्रिटीकरण झालेला मार्ग वेळीच रस्त्त्याला जोडला गेला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रिया नागरिकांसह वाहनचालकांमधून व्यक्त होत आहेत.
सध्या वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याची चाळण झाली असून, अर्धा फूट खोल खड्डांमधून वाहने चालवावी लागत आहेत. साळवीस्टॉप हा चौक झाला असून, या ठिकाणी सध्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे वाहनांसाठी एक बाजू मार्ग वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्यात आहे. या चौकात रत्नागिरी शहरातून हातखंब्याकडे तर हातखंब्याकडून रत्नागिरी शहराकडे वाहतूक सुरू असते, त्यात परटवणेकडून येणारी वाहने जोडली जातात.
तसेच नाचणे रोडकडून येणारी वाहनेही याच ठिकाणी मुख्य रस्त्यावर येत असतात. त्यामुळे रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे त्यात अधिक भर पडली आहे. बुधवारी (ता. २१) मॉन्सूनपूर्व मुसळधार पाकाने वाहनचालकांची सत्वपरीक्षाच पाहिली होती. चौपदरीकरणामुळे काही ठिकाणी मातीचे ढिगारे ठेवले आहेत. सध्या वाहने जात असलेल्या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनचालकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. साळवी स्टॉप ते जे. के. फाईल्स या अवघ्या २०० मीटरच्या अंतरावर जाण्यासाठी सुमारे एक तास लागत आहे.
यामध्ये मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीत आणखीनच अडथळा बुधवारी सायंकाळी काँक्रीट केलेल्या रस्त्यावरून वाहतूक वळवण्यात आली मात्र तो रस्ताही खराब असल्याने तिथेही कोडी होत होती. या पय गोंधळामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. दिवसा या ठिकाणी पोलिस होते; परंतु प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई असल्याने त्यांचाही नाईलाज होत होता. सायंकाळी साळवी स्टॉप येथे एसटी बसेस, खासगी बसेस प्रवाशांसाठी थांबतात. त्यामुळे वाहनांना अडथळा होतो. पावसामुळे वाहनचालकांची अधिक गैरसोय होत असून, सायंकाळच्या सुमारास कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे संख्याबळ वाढवणे आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
जे. के. फाईल्स रोडवर अडथळा
जे. के. फाईल्स थांब्यापासून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळत आहेत. या मार्गावरील अर्धा रस्ता या वाहनांनीच अडवून ठेवलेला आहे. त्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी होते. हा रस्ता मुख्य रस्त्याला जोडलेला असल्याने त्याचा फटका मुख्य रस्त्यावरून एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनांना बसतो. तिथेही वाहतूक कोंडी होते.
साळवीस्टॉप येथील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे अपेक्षित होतेः मात्र दोन्हीपैकी एकाही लेनचे काम झाले नसल्याने येथे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पावसाचे पाणी आजूबाजूच्या इमारतींमध्ये जात आहे. त्याचाही त्रास नागरिकांना होत आहे. या ठिकाणी सेवा रस्ताच नसल्यामुळे नियमित ये-जा करणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तिथे करणे गरजेचे आहे – सौरभ मलुष्टे, नागरिक, साळवीस्टॉप
साळवीस्टॉप हे रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार आहे. सध्या परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे वाहनांची संख्याही अधिक आहे. त्यात पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे चौपदरीकणाच्या कामांची ऐशी की तैशी झालेली पाहायला मिळत आहे. सध्या कामातील त्रुटी लक्षात घेऊन मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वी पुढील आठ दिवसांत योग्य त्या उपाययोजना संबंधित ठेकेदाराने करणे आवश्यक आहे.-प्रसाद सावंत, रत्नागिरी
हे आहेत पर्यायी मार्ग
मुख्य सत्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रत्नागिरीतून कोकणनगर मार्गे विमानतळावरून एमआयडीसी, रेल्वेस्टेशनकडे जाता येते. तसेच रत्नागिरीतून नाचणे मार्गे कुवारबावला जाणे शक्य आहे, जेणेकरून साळवीस्टॉपवरील होणारी कोंडी कमी करणे शक्य आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 23/May/2025














