राजापूर : राजापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे; मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला होता. विजेच्या लपंडावामुळे तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मॉन्सूनपूर्व पावसामध्ये अशी स्थिती असेल तर प्रत्यक्ष पावसाळ्यात काय होईल, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यामध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत आहे. अशातच काल ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट करत तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला. अक्षरक्षः पावसाने राजापूरवासीयांना झोडपून काढले होते. पावसाळ्याच्या अनुषंगाने गटारांची साफसफाई केल्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र होते. या पावसामध्ये तालुक्यामध्ये कुठेही नुकसान झालेले नाही. काही गावांमध्ये विजेच्या तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता.
अनेक गावांमधील बत्ती अजूनही गूल झालेली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा कार्यान्वित करण्यासाठी महावितरण विभागाकडून प्रयत्न सुरू असले तरीही सायंकाळी उशिरापर्यंत अनेक गावांमधील वीजपुरवठा कार्यान्वित झालेला नव्हता. काल दिवसभरामध्ये तालुक्यामध्ये ४४.६२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी आज मात्र, पावसाचा जोर कमी झालेला होता. दिवसभर सरींवर सरी असा पाऊस कोसळत होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 23/May/2025














