पावस परिसरात संततधार सुरू; गौतमी नदीला पाणी

पावस : पावस परिसरात तिसऱ्या दिवशीही संततधार सुरू असल्याने गौतमी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या नदीपात्रात रस्त्याशेजारी संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे; परंतु पावसामुळे या भिंतीसाठी आणलेली वाळू आणि खडी पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे ठेकेदाराचे नुकसान झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही अर्धवट राहिले आहे.

पावस पंचक्रोशीत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे टंचाईची समस्या मिटली असली तरी विजेची समस्या वाढली आहे. वारंवार जाणाऱ्या विजेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या परिसरामध्ये अंडरग्राउंड केबल टाकण्यात आल्या आहेत. तरीही गेले तीन दिवस वारंवार वीज जात आहे. तीन दिवस पडणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने अंतिम टप्प्यातील हापूस आंबा गळून पडला असून, बागायतदारांचे नुकसान झाले आहे. आंब्याचा दरही घसरला असून, पावसामुळे ग्राहकांनीही आंब्याकडे पाठ फिरवली आहे.

रत्नागिरी-पावस मार्गावर भाट्ये येथील झरी विनायक मंदिराजवळील रस्त्यावर सुरूचे झाड पडल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली होती; परंतु स्थानिक ग्रामस्थांनी हे झाड तोडून मार्ग मोकळा केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 23/May/2025