संगमेश्वर : माभळेतील कातळावर पिकवला कांदा

संगमेश्वर : घाटमाथ्यावर होणारे कांदा पीक संगमेश्वर तालुक्यातील माभळे येथील कातळावरही होऊ शकते, हे प्रकाश घडशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.

नाशिक अथवा लासलगांवमध्ये उन्हाळ्यात वीस रुपयांना मिळणारा कांदा पावसाळ्यानंतर थेट ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचतो. तेव्हा महिलांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येते. अशावेळी कोकणवासीयांच्या मदतीला ठेवणीचा कांदाच येतो; मात्र कांद्याच्या साठ्यालाही मर्यादा आहेत. त्यावर कोकणातील शेतकरी आता पर्याय उपलब्ध करू लागले आहेत.

भातशेतीबरोबरच कांद्याचे पीक घेऊन नवा प्रयोग करण्यात यशस्वी झाले आहेत. थोड्या प्रमाणावर का होईना; मात्र कोकणात कांद्याचे पीक यशस्वी होऊ शकते, हे संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील प्रकाश घडशी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवून दिले आहे.

कातळावरील जमिनीवर पारंपरिक पिके घेण्यावर भर दिला जातो; मात्र संगमेश्वर जवळच्या माभळे येथील कातळभागावर येथील घडशी कुटुंबीयांनी कांदा पीक घेऊन ते चांगल्या पद्धतीने पिकवून कोकणातील शेतकऱ्यांना चांगला आदर्श घालून दिला आहे. घडशी कुटुंबीयांपैकी अण्णा घडशी हे चापोली कृषी विद्यापीठात असल्याने त्यांनी सर्व कुटुंबीयांच्या सहकायनि प्रगती करण्यास सुरुवात केली. त्यांना कृषी अधिकारी प्रकाश घडशी यांचे सहकार्य मिळाले, पालेभाज्यासह त्यांनी कांदा पीक घेण्याचे निश्चित केले.

घाटमाथ्यावर होणारे कांदा हे पीक त्यांनी माभळे येथील कातळभागावर घेऊन ते चांगल्या पद्धतीने होते हे दाखवून दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकारी कांदा पीक घेण्यास उत्सुक असतील तर त्यांना मार्गदर्शन करण्याचीही घडशी यांनी तयारी दर्शवली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 23/May/2025