चिपळूण : गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी यावर्षी पनवेलऐवजी एलटीटी, दादर, दिव्यावरून विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील शहर आणि तसेच मुंबई उपनगरातील कोकणवासीयांना पनवेल रेल्वेस्थानक गाठून विशेष रेल्वेगाडीतून प्रवास करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होत आहे; परंतु, कोकणवासीयांचे कोकणात येण्याचे नियोजन सुरू झाले आहे. यावर्षी प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखद होण्यासाठी प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. गेल्या वर्षी गणपती उत्सवादरम्यान रेल्वेने पुण्याहून फक्त एकच विशेष रेल्वेगाडी सुरू केली होती
तसेच ही रेल्वे फक्त रत्नागिरीपर्यंत चालवण्यात आली होती. गेल्या हिवाळी हंगामात आणि उन्हाळी सुट्यांमध्ये पुण्याहून कोकणापर्यंत एकही विशेष रेल्वेगाडी चालवण्यात आली नाही. त्यामुळे हंगामी आणि नियमित प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्यरेल्वेने पुण्याहून कल्याणमार्गे रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा विचार करावा, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. दिवसा मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई-पुणे ते चिपळूण-रत्नागिरीदरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअरकार जोडावी.
यामुळे शयनयान आणि तृतीय श्रेणी डब्याच्या तुलनेत द्वितीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअरकार डब्यात जास्त प्रवासी सामावतील. दिवा-रोहा मेमूचा चिपळूणपर्यंत विस्तार करण्याऐवजी सीएसएमटी चिपळूण विशेष रेल्वेगाडी सोडण्यात यावी. या रेल्वेगाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे द्यावेत, यांसह या मार्गावर आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही रेल्वेगाड्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
प्रवाशांसाठी गणेशोत्सव काळात मालगाड्या आणि रो-रो सेवा बंद करावी. गाडी क्र. २२२२९ आणि २२२३० सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. १२ डब्यांच्या मेमू चालवण्याऐवजी २२ डब्यांची एलएचबी किंवा २४ डब्यांची आयसीएफ रेक असलेल्या रेल्वेगाड्या चालवण्यास प्राधान्य द्यावे. करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखवटी, अंजनी, कडवई, वेरवली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, स्थानकांवर किमान दोन रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 23/May/2025














