संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करत पक्षाची ध्येयधोरणे व प्रतिमा जनसामान्यांपर्यंत पोहोचवत पक्षाची बांधणी मजबूत करा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार पक्ष) प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मुंबईत रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले. थोड्या मतांनी हुकलेल्या विजयाचे शल्य बाजूला ठेवून आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम केले पाहिजे. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस आदिती नलावडे, प्रदेश सरचिटणीस प्रभाकर चाळके, प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुजा, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, ज्येष्ठ नेत्या नलिनी भुवड यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, फ्रंटल सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 23/May/2025














