विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावेत : दीपक घाटे

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीविषयक योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे परिपूर्ण अर्ज सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या लॉगिनला ऑनलाईन करून घ्यावेत. जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची काटेकोर दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे यांनी केले आहे.

महाडीबीटी पोर्टलद्वारे २०१८-१९ पासून ऑनलाईन प्रक्रिया अर्ज भरण्यासाठी राबविण्यात येत आहे.

भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्री शिप व विद्यावेतन इत्यादी योजनांचा लाभ मिळावा यासाठी चालू शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावयाचे आहेत.

त्याची सुरुवात १५ जूनपासून करण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षांत या योजनांची प्रभावी अमंलबजावणी होण्यासाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमांसाठी १५ ऑगस्टपर्यंत, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १० सप्टेंबरपर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत निर्धारित केलेली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 23/May/2025