मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामाला मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

रत्नागिरी : मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाला मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका बसला आहे. अर्धवट कामाच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदार कंपनीकडून देण्यात आले. जे. के. फाईल्स येथे क्रॉसिंगला भूमिगत मार्ग, मजगावला जंक्शन, कुवारबावला भविष्यात ब्रीज नियोजित आहे. ५९ किमीचा मिऱ्या-नागपूर महामार्ग पूर्ण झाला असून, १५ कि.मी. मार्ग शिल्लक राहिला आहे. पुढील डिसेंबरपर्यंत मार्ग पूर्ण करण्याची डेडलाईन ठेकेदार कंपनीने दिली आहे. या कामाचे ६५ कोटींचे वाढीव अंदाजपत्र झाल्याचे ठेकेदार कंपनीकडून सांगण्यात आले.

माजी खासदार विनायक राऊत यांनी मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचे अधिकारी कुलदीप दीक्षित यांच्याबरोबर बैठक घेऊन कामांचा आढ़ावा घेतला. अनेक ठिकाणी कंपनीच्या अधिकाऱ्याशी वाद होत आहेत. चांगले वागा दादागिरी खपून घेतली जाणार नाही, असे राऊत यांनी सुनावले. मिऱ्या -नागपूर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ९३० कोटीचा हा प्रकल्प आहे; परंतु अलीकडे या कामाची गती रेंगाळल्याची दिसून येते. अनेक टप्प्यावर विस्कळीत स्वरूपाचे झाले आहे. कोणत्या ठिकाणाच्या टप्यातील काम पूर्ण होताना दिसत नाही. कामे पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणामार्फत मार्च २०२५ ची दिलेली मुदत आता उळली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांनी या महामार्गाबाबतच्या अनेक तक्रारी मांडल्या.

खेडशी येथे महामार्गालगताच्या वीजखांब उभारण्याचे काम निकृष्ट असल्यामुळे तेथील रहिवाशांना वीजपुरवठ्यात मोठा अडथळा आल्याचे सांगण्यात आले. ही समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश राऊत यांनी दिले. रत्नागिरीतून जाणाऱ्या या महामार्गाने चार कि.मी.चे काम प्रलंबित राहिलेले आहे. पाईपलाईन बदलण्याच्या कामामुळे ते प्रलंबित असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. या महामार्गांचे काम डिसेबरपर्यंत पूर्णच नेण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासन कंपनीने दिले. साळवी स्टॉप येथील खराब रस्त्याबाबत तक्रार करण्यात आली, परंतु आम्ही दोन दिवसात मार्ग सुरू करत असल्याचे कंपनीने सांगितले. मजगाव मार्गावरील चर्मालय जंक्शन या नाक्यात महामार्गातून थेट रस्ता क्रॉसिंग होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 23/May/2025