राजापूर : अर्जुना-कोदवली’तील उपसलेला गाळ नदीकाठावरच

राजापूर : शहरातील पूरस्थितीला आळा घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळ उपसण्यात आला. उपसलेला गाळ नदीकाठावरच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात तो पुन्हा नदीत वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गाळ काढण्याच्या कामाचा मूळ उद्देश सफल झाला का? हे पाऊसच दाखवून देणार आहे.

राजापूर शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने दरवर्षी पावसाळ्यात शहरवासियांना पुराच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून राजापूर नगर परिषद प्रशासनाने यापूर्वी नाम फाउंडेशन आणि महसूल प्रशासनाच्या माध्यमातून गाळ उपशाचे काम हाती घेतले होते.

मागील दोन वर्षांपासून लोकसहभागातूनही काही प्रमाणात गाळ काढण्यात आला होता, मात्र तरीही मोठ्या प्रमाणात गाळ शिल्लक होता. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला, ज्यातून सध्याचे गाळ उपशाचे काम सुरू आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुना-कोदवली नदीपात्रातील एकूण १ लाख २७ हजार २०० घनमीटर गाळापैकी आतापर्यंत २० हजार ७०० घनमीटर (सुमारे १६ टक्के) गाळ उपसण्यात आला आहे. यामध्ये अर्जुना नदीपात्रातील कोंढेतड पूल ते राजीव गांधी क्रीडांगण दरम्यानच्या ७७ हजार ५३५ घनमीटरपैकी १७ हजार ८५० घनमीटर, तर कोदवली नदीपात्रातील जवाहरचौक ते गणेश घाट भागातील ४९ हजार ६६५ घनमीटरपैकी २ हजार ८५० घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. सध्या तीन पोकलेन, तीन डोजर आणि पाच डंपर यांच्या साहाय्याने हे काम सुरू आहे.

मात्र, उपसलेला गाळ नदीकाठावरच ‘पिचींग’ करून ठेवण्यात येत असल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक, गाळ उपसल्यानंतर तो नदीपात्रातून अन्यत्र सुरक्षित ठिकाणी नेणे अपेक्षित आहे, जेणेकरून नदीपात्र पूर्णपणे मोकळे होईल. महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांना हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्याचे आवाहन केले होते, परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

त्यामुळे नदीपात्रातील उपसलेला गाळ तसाच काठावर ठेवल्यास पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढताच हा गाळ पुन्हा नदीपात्रात वाहून येऊन साचण्याचा आणि नदीपात्र पुन्हा गाळाने भरण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. या प्रकारामुळे पूरस्थितीची समस्या पुन्हा कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 23/May/2025