खेड रेल्वे स्थानकातील नवीन शेडमधून गळती

खेड : रेल्वे स्थानकावर गेल्या वर्षी तब्बल आठ ते नऊ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधलेल्या शेड आणि परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसात या नवीन शेडमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांना शेडखाली उभे राहताना छत्री उघडावी लागली, तर काही प्रवासी भिजतच रेल्वे गाडीत चढताना दिसले.

पावसाळा अजून सुरू व्हायचा असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती होणे, हे या शेडच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. सुशोभीकरणाचे कामही अजून अर्धवटच असल्याने स्थानिकांकडून यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता प्रवाशांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 23/May/2025