आरवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली बाजारपेठेत उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर असलेल्या बस थांब्यावरील उघडे गटार प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. ठेकेदाराने गटाराचे काम अपूर्ण ठेवल्याने आणि त्यावर झाकणे न बसविल्याने हा धोका निर्माण झाला असून, पावसाळा सुरू झाल्याने त्यात आणखी वाढ झाली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली बाजारपेठेतून जाणाऱ्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण अलीकडेच पूर्ण झाले आहे. मात्र, उड्डाणपुलाखालील या थांब्यावर गटाराचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्यावर झाकणे बसविण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे हे गटार उघड्यावरच राहिले आहे.
एसटी बस थांब्यावर असलेल्या या उघड्या गटारामुळे प्रवाशांना विशेषतः रात्रीच्या वेळी आणि अंधारात चालताना मोठा धोका निर्माण झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने पाण्याची पातळी वाढून किंवा गटारात कचरा साचून तो आणखी धोकादायक बनण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी याकडे लक्ष वेधले असून, स्थानिक ग्रामस्थ दिनेश परकर यांनी तातडीने या उघड्या गटारावर झाकणे बसवावीत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 23/May/2025














