खेड : शिवकालीन घाटवाटांचे ट्रेकर्सना आकर्षण

खेड : इतिहासकालीन दुर्ग, किल्ले यांच्याशी ट्रेकर्सचे अगदी जवळचे नाते आहे. त्यामुळेच याठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी कोकणातील राकट पर्वत रांगांपासून ते थेट सह्याद्रीच्या इतिहासाची यशोगाथा सांगणाऱ्या दुर्गापर्यंत जाणाऱ्या पायवाटांचे आकर्षण ट्रेकर्स मंडळींना आहे.

या मुळेच कोकणात ट्रेकर्सची पावले आता घाट वाटा शोधून त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. १७ व्या शतकात २६० हून अधिक घाट वाटा वापरात होत्या. या घाटवाटांचे आकर्षण आजही ट्रेकर्सना आहे.

औरंगजेब दक्षिणेत उतरला होता. तेव्हा त्याच्या एका सहकाऱ्याने सह्याद्रीचा अख्खा नकाशा (ब्लू प्रिंट) मांडला होता. त्यावरूनच या घाटवाटा आजही ट्रेकर्सना आकर्षित करत आहेत. २० व्या शतकात त्यातल्याच काही निवडक घाटवाटा कोकणाच्या रस्त्याला जोडल्या गेल्या आहेत. कशेडी, ताम्हीणी, माळशेज, कुंभार्ली, आंबोली, वरंद यासारखे जवळपास ५० हून अधिक मार्ग रस्त्यांनी जोडले आहेत. पण दोनशेहून अधिक घाटवाटा अजूनही रस्त्याने जोडलेल्या नाहीत. अगदी आजच्या काळातही वाहने जाऊ शकणार नाहीत. इतक्या वेगात आणि कमी वेळात घाटावरचा माणूस कोकणात किंवा कोकणातला माणूस घाटमाथ्यावर या घाटवाटांनी प्रवास करतो आहे. याचेच आकर्षण ट्रेकर्सना वाटते आहे. यासाठी त्या घाटवाटा शोधण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे. पावसाळ्यानंतर दाट धुक्याची शाल पांघरून थंडीचे आगमन होते. याच हंगामात अनेक साहसी तरुण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकंती करण्यासाठी सज्ज होतात.

पर्वत रांगांमधील सह्याद्रीच्या ताशीव कातळामध्ये असलेले दुर्गवैभव व सह्यकडे ट्रेकर्संना आता साद घालू लागले आहेत. सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये असलेले किल्ले रसाळगड, महिपतगड, सुमारगड, पालदुर्ग, किल्लेमाची, नागेश्वर, महिमंडणगड, तर खेड सातारा मार्गावरील चकदेव, परबत या सारख्या अनेक ठिकाणातील कठीण ट्रेक प्रसिद्ध आहेत. या ट्रेकवर पावसाळा व हिवाळा या कालावधीत ट्रेकर्स दाखल होण्याची संख्या अधिकच आहे. दाखल होणारे ट्रेकर्स आपले ब्लॉग अथवा सोशल मीडियावर कोकणाच्या सह्य कड्यांचा उलगडा होणाऱ्या ट्रेकच्या माध्यमातून मांडत असतात. कोकणात सर्वाधिक ट्रेक तालुक्यातील डोंगर रांगांवर पाहावयास मिळतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 11/Oct/2024