गुहागर : गुहागर-चिपळूण मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या गुहागर आगारातील कर्मचाऱ्याला गुहागर नगरपंचायतीने २०० रुपये दंड ठोठावत कारवाई केली. मात्र, या कारवाईमुळे उचलून नेलेला कचरा पुन्हा त्याच ठिकाणी टाकून या कर्मचाऱ्याने उद्दामपणा दाखविल्याचे पुढे आले आहे.
गुहागर-चिपळूण मार्गावर श्री सदस्यांतर्फे स्वच्छता अभियान घेण्यात आले होते. शहरातील विविध संस्था, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून गुहागर समुद्रकिनारा त्याचबरोबर मुख्य रस्ते स्वच्छ केले. मात्र, नागरिकांकडून पुन्हा रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत.
बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान गुहागर आगारातील वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला खुलेआम रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना रंगेहात पकडण्यात आले. गुहागर नगरपंचायतीने त्यांना २०० रुपये दंड ठोठावून कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर त्या कर्मचाऱ्याने सायंकाळी ६ वाजता घरी नेलेला तो कचरा पुन्हा रस्त्याच्या कडेला आणून टाकल्याचे समोर आले आहे. याबाबत गुहागर नगरपंचायतीकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे आता गुहागर नगरपंचायत कोणती कारवाई करते हे पाहायचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 23/May/2025














