चिपळूण : शहरातील मच्छी-मटण मार्केटसह भाजी मंडई इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल दोन दिवसात येणार आहे. नगर परिषदेने या दोन्ही इमारतीची तपासणी वालचंद शासकीय महाविद्यालय सांगली यांच्याकडून करून घेतली आहे. अहवालानंतर दोन्ही प्रकल्पांच्या लिलावाची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे.
२० वर्षांपूर्वी मच्छी-मटण व भाजी मंडईच्या पूर्वीच्या इमारती पाहून त्याजागी नव्या इमारती बांधण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यात राजकारण शिरल्याने हे दोन्ही प्रकल्प आजतागायत सर्व सोयी-सुविधांयुक्त पूर्ण होऊ शकलेले नाहीत. तरीही त्यामधील गाळ्यांचा अनेकदा लिलाव करण्याचा प्रयत्न नगर परिषदेने केला.
मात्र भाड्याने देण्याची वर्षे, मोठी नापरतावा अनामत व भाड्याची आवाक्याबाहेरील रक्कम यामुळे सुविधा नसलेले गाळे घेण्यापेक्षा बाजारात नवे गाळे घेऊन व्यवसाय केलेला बरा अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतल्याने हे दोन्ही प्रकल्प इतकी वर्षे पडून आहेत. मात्र मुख्याधिकारी भोसले यांनी यामुळे नगर परिषदेचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता या प्रकल्पांचा लिलाव करण्याचे काम हाती घेतले.
मात्र या दोन्ही प्रकल्पांमध्ये सुविधा नसल्याने त्याचे फेरमूल्यांकन करावे, अशी मागणी सुरुवातीपासून ज्येष्ठ भाजी व्यावसायिक सुधीर शिंदे व अन्य काही व्यावसायिकांनी केली होती.
त्यामुळे ती मागणी विचारात घेऊन मुख्याधिकारी भोसले यांनी महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीकडून माजी मंडईतील ६२ गाळे, २१ ओदे, मच्छी-मटण मार्केटमधील ४३ गाळे पवनतलाव मैदान परिसरातील इमारतीतील ७ गाळे व गोवळकोट धक्का येथील कॅन्टीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यास मंजुरी मिळवून आणली आहे.
तसेच नापरतावा अनामत रक्कम, भाडेहेही ठरले आहे. त्याच्या मागील रक्कमा पाहता त्यात आता मोठी, पसरण झाली असल्याने लिलावात सहभागी होण्याची तयारी व्यावसायिकांनी दाखवल्याचे दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:59 PM 23/May/2025














