रत्नागिरी, २३ मे २०२५: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १३ बांग्लादेशी नागरिकांना भारतात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी प्रत्यार्पण करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
११ नोव्हेंबर २०२४ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही बांग्लादेशी नागरिक भारतात अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती समोर आली. यावर तातडीने कारवाई करत पोलिसांनी छापा टाकला आणि खालील १३ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते.
या सर्वांची कसून चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. यावरून त्यांनी भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरी पोलिसांनी पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ति अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पूर्णगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. रत्नदीप साळोखे यांनी केला आणि मुदतीत दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर केले.
या प्रकरणाची सुनावणी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी मा. श्री. निखिल गोसावी यांच्यासमोर झाली. त्यांनी सर्व १३ आरोपींना प्रत्येकी ६ महिन्यांची साधी कैद आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर रत्नागिरी पोलीस दलाने संबंधित यंत्रणांशी पाठपुरावा करून २० मे २०२५ रोजी या सर्व १३ बांग्लादेशी नागरिकांचे त्यांच्या मायदेशी प्रत्यार्पण यशस्वीपणे केले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड आणि पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील, स.पो.नि. श्री. रत्नदीप साळोखे, पो.उपनि. श्री. योगेश खोंडे यांच्यासह पोलीस हवालदार आणि शिपाई यांचा समावेश होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 23-05-2025














