रत्नागिरी : जिल्ह्यात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे होणार कर्करोग निदान

रत्नागिरी : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी आणि कर्करोगाचे लवकर निदान सुलभ करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागामार्फत अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅन (फिरते रुग्णालय) दि.२६ मे २०२५ पासून वेळापत्रका प्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर कार्यरत होईल.

या उपक्रमाचा उद्देश रत्नागिरीतील रहिवाशांपर्यंत, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत, महत्त्वपूर्ण तपासणी सेवा पोहोचवणे हा आहे. यामुळे वेळेवर निदानात सुधारणा होईल आणि संभाव्यतः अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल. ही व्हॅन सामान्य कर्करोगांच्या तपासणीसाठी सुसज्ज आहे, ज्यात सुरुवातीला डिजिटल मशीन वापरून स्तनाच्या तपासण्या आणि कॉल्पोस्कोप वापरून गर्भाशयाच्या मुखाच्या तपासण्या यावर लक्ष केंद्रित केले जाईल. कारण कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

मे. मिडिऑन हेल्थकेलेअर यांचेकडून कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन प्राप्त झाली असून रत्नागिरी जिल्हयामध्ये माहे मे व जून २०२५ मध्ये गावभेटीतून व्हॅन मध्ये मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून कर्करोगाचे निदान केले जाणार आहे. सदरील कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन सोबत रत्नागिरी जिल्हयातील गावभेटीकरीता दंत शत्य चिकित्सक, स्त्री रोग तज्ञ यांची नियुक्ती केली आहे. तसेच तालुका स्तरावरील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैदयकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर व्हॅन ज्या तालुक्यामध्ये सेवा देईल त्या तालुक्यामधील एन. सी.डी. स्टाफ नर्स, एन.सी.डी. कौन्सिलर, आरोग्य सहाय्यक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सपोर्ट स्टाफ व शिपाई अशी टिम सदैव व्हॅन सोबत कार्यरत असणार आहे.

ज्या ठिकाणी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन कर्करोग तपासणीकरीता जाणार आहे अशा ठिकाणी आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करणेकामी जनजागृती करण्यात येणार आहे. याकामी सबंधित ग्रामपंचायतीनी सहकार्य करावे व या मौल्यवान संधीचा मोफत लाभ घेऊन 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी मुख, स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:16 PM 23/May/2025