रत्नागिरी : समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून दरवर्षी विभागस्तरीय कार्यशाळेला सर्व ग्रंथपाल उपस्थित असतात. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्याच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाषेची अडसर येऊ न देता, ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालयद्वारा आयोजित विभागस्तरीय राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या अर्थसाह्याच्या विविध योजनांविषयी विभागस्तरीय कार्यशाळेचे आज समिती सदस्य किरण धांडोरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी देशपांडे बोलत होते.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्रीकृष्ण साबणे, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात देशपांडे म्हणाले, वाचन कमी होत चालले आहे.. वाचकांची संख्याही कमी होत आहे. माणसे एकमेकांशी बोलायची कमी झाली आहेत. केवळ मोबाइलवरील संदेशाद्वारे बोलत आहेत. ही परिस्थिती बदलायची असेल, तर घराघरात ग्रंथ घेऊन जावे लागेल. त्यांना मोफत वाचायला द्यावे लागतील. त्यामधून वाचनाची सवय वाढवावी लागेल.
दोन दिवसीय कार्यशाळेतील विविध सत्रांचा लाभ घेताना आर्थिक बाबीच्या योजनांचा लाभही घ्यावा, असे धांडोरे म्हणाले. वाचन माणसाला समृद्ध बनवते. पुस्तक वाचनामुळे मी घडलो, आजही पुस्तके वाचतो, असे गायकवाड यांनी सांगितले. साबणे, पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:28 23-05-2025














