रत्नागिरी : पावसाळ्यात पशुधनाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : पावसाळ्यात जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता अबाधित राखण्यासाठी जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे असते. पशुसंवर्धन विभागाकडून पावसाळ्यापूर्वी जनावरांना लसीकरण मोहीम राबविली जाते. पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून केले जाते.

ओलसर आणि दमट वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. योग्य काळजी घेतली नाही तर जनावरांच्या प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम होतो. पावसाचे पाणी गोठ्यामध्ये येणार नाही याची दक्षता घ्यावी. ताडपत्रीचे पडदे गोठ्याच्या बाजूला लावावेत जेणेकरून पाऊस आत येणार नाही व गोठा ओलसर होणार नाही. पावसाळ्यात बाह्य व आंतरपरजिवी जंतूंचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जसे गोचीड, गोमाशा, डास, चिलटे या कीटकांच्या चाव्यामुळे थायलेरियासिस, सर्रा आदी प्रकारच्या आजारांचा प्रादुर्भाव होतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करावी.

जनावरांना वर्षातून दोनदा हवीत जंतुनाशके
पावसाळ्यापूर्वी घटसर्प, एकटांग्या या आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे. शेळ्यामेंढ्यांमध्ये आंत्रविषार रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी. वर्षातून दोनदा जंतनाशक औषध देणे फायदेशीर ठरते. शेळ्या नदी नाल्या काठी चरावयास सोडू नयेत.

पावसाळ्यात दुभत्या जनावरांची निगा राखा
पावसाळ्यात दुभत्या जनावरांची अधिक काळजी घ्यावी. त्यांचे नियमित लसीकरण करून घ्यावे. जंत असतील तर शेणातून जंत पडतात. शेणाला उग्र वास येतो. त्यामुळे वेळीच उपचार करावेत.

जनावरांच्या पोटात कुठले जंत आढळतात ?
पशुधनाच्या पोटामध्ये पट्टकृमी, गोलव्रमी, लिव्हर फ्लूक्स आदी प्रकारचे जंत आढळून येतात. पशुधनाला कोणताही त्रास होत असेल तर त्यांच्यावर वेळीच उपचार करावेत.

जनावराची भूक मंदावते, वारंवार आजारी पडते
पशुधनाच्या पोटात जंत झाले तर भूक मंदावते, कातडी राठ होते, रक्त कमी होते. प्रसंगी जनावराचा मृत्यूही होऊ शकतो.

जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरणाचा काय फायदा?
पशुधनाचे पावसाळ्यापूर्वी लसीकरण केले तर जंत होण्यासह घटसर्प, लम्पी, फऱ्या आणि चर्मरोगापासून त्यांचा बचाव होतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:30 PM 23/May/2025