रत्नागिरी : कृषी निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी कराव्यात. या निविष्ठा खरेदी करताना त्यावर लिहिलेली पॅकिंग तारीख, अंतिम तारीख, लेबल क्लेम इत्यादी बाबी तपासून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ ची पूर्व तयारी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकृत निविष्ठा विक्रेते यांची बैठक आयोजित केली होती. चुकीच्या पद्धतीने कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. कोणत्याही अवैध व्यवहाराला पाठीशी घातले जाणार नाही. अवैध पद्धतीने वागणाऱ्याना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांना बनावट बियाणे, बनावट खते अथवा बनावट किटकनाशके विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील, असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी दिला.
खरीप हंगाम २०२५-२६ ऐन तोंडावर असून खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे व खते पुरवठा सुरु झालेला आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम हाच मुख्य हंगाम असून कृषी निविष्ठा खरेदीचा कालावधी देखील अत्यंत अल्प म्हणजे फक्त दोन-तीन महिन्याचा असतो. शेतकऱ्यांनी परिपूर्ण असलेले खरेदीचे पक्के बिल संबंधित विक्रेत्याकडून न चुकता घ्यावे व ते जपून ठेवावे. बियाणे पेरणी करतांना पाकिटावरील लेबल, पाकीट व थोडे बियाणे बाजूला काढून जपून ठेवावे. अनुदानित रासायनिक खते खरेदी करताना आधार कार्ड लिंक करूनच खरेदी करावी. जादा दराने खते, बियाणे खरेदी करू नयेत. जादा दराने तसेच बनावट खते/बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती कृषी विभागाच्या तक्रार हेल्पलाइनला संपर्क करून देण्यात यावी. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व गुण नियंत्रण निरीक्षकांना गुणवत्ता तपासणीसाठी तात्काळ निविष्ठा नमुने काढण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:52 PM 23/May/2025














