लांजा : भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आणि देशभक्तीच्या भावनेने लांजा व्यापारी संघटनेच्या वतीने शुक्रवारी लांजा येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून राष्ट्रप्रेमासाठी एकत्र आलेल्या लांजावासियांचे स्वागत केले. यावेळी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार आमदार किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
रॅलीला संबोधित करताना आमदार सामंत म्हणाले, “ही रॅली कोणत्याही पक्षाची नाही, तर लांजावासियांची आणि राष्ट्रप्रेमाची आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सुखाने झोपतो. शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आणि लष्कराच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली आहे.” त्यांनी लांजा वासियांनी दाखवलेल्या एकजुटीचे कौतुक करताना सांगितले की, राष्ट्रप्रेमात कोणतेही मतभेद नसतात. “लांजा वासियांनी तिरंगा झेंड्याखाली एकत्र येऊन महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी आणि व्योमिका सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल जगाला माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. “देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना लांजा वासियांनी या रॅलीद्वारे ताकद दिली आहे,” असे सांगत त्यांनी लांजा व्यापारी संघटना, व्यापारी आणि सर्व नागरिकांचे आभार मानले.
रॅलीत लांजा तहसीलदार प्रियंका ढोले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, राजू कुरूप, महंमद रखांगी, विजय कुरूप, सचिन माजलकेर, राहुल शिंदे, सुजित आंबेकर, प्रसाद माने, सचिन डोंगरकर, बाबा लांजेकर, संपदा वाघदरे, नितीन शेट्ये, हुसेन नेवरेकर यांच्यासह अनेक लांजावासी आणि व्यापारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 24-05-2025














