कोंडअसुर्डे परिसरातील गावे अंधारात

संगमेश्वर : तालुक्यात बुधवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास संगमेश्वर येथील पारेख पेट्रोलपंपाजवळ महामार्गाच्या कामादरम्यान माती काढताना वडाचे झाड कोसळले. या घटनेमुळे कसबा उच्चदाब वाहिनीचे सहा वीजखांब वाकले. महावितरणने तातडीने कामाला सुरवात केली. गुरूवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत तीन नवीन खांब उभारून तारा ओढण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे परवा आणि काल रामपेठ, मापारीमोहल्ला (काही भाग), आयटीआयजवळील परिसर, सह्याद्री नगर आणि पुनर्वसन आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

भरपावसात दिवसभर काम करूनही कामाचे प्रमाण जास्त असल्याने कोंडअसुर्डे, मौजेअसुर्डे आणि मापारीमोहल्ला येथील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे. महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. महावितरण संगमेश्वरने खंडित वीजपुरवठ्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला असून, नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 24/May/2025