Ratnagiri : खेड, मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत

रत्नागिरी : गेल्या मंगळवारपासून (दि. 20 मे ) चालू असलेल्या सततच्या पावसामुळे खेड, मंडणगड व दापोली तालुक्यातील वीजपुरवठा बाधित झाला होता. महावितरण कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेत या तिन्ही तालुक्यांतील वीजपुरवठा सुरळीत केला आहे.

मंडणगड तालुक्यातील 33 केव्ही वाहिनीवर 20 मे रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान तुळशी गाव परिसरात वीज पडली. यामुळे ही वाहिनी बंद पडली. याचबरोबर याचा परिणाम 33 केव्ही केरील उपकेंद्रावर झाला. मात्र महावितरण यंत्रणेने आधीच उभ्या केलेल्या पर्यायी यंत्रणेमुळे या वाहिनीवरील ग्राहकांचा वीजपुरवठा काही तासांतच सुरळित करण्यात आला.

बाधित वाहिनी पुन्हा सुरू करण्यास एकूण 43 इन्सुलेटर्स बदलावे लागले. तुळशी गाव , देव्हारे, बाणकोट या परिसरातील जंगलातून ही वाहिनी येत असल्यामुळे हे काम अत्यंत जिकिरीचे व आव्हानात्मक होते. 33 केव्ही वीज वाहिनीवर काम करण्यासाठी कमीत कमी आठ ते नऊ कामगारांचा संच लागतो व सर्व प्रकारचे साहित्य बरोबर असावे लागते. ही सर्व तयारी स्थानिक अधिकाऱ्यांनी आधीच करून ठेवली होती.

मुख्य अभियंता अनिल डोये, प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई व कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व तांत्रिक कर्मचारी, सहकारी व सूचीबद्ध कंत्राटदार तसेच त्यांचे कर्मचारी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नांना यश आले आणि काल, दि. 22 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही बाधित वाहिनी पूर्णतः पूर्ववत करण्यात आली.

मान्सूनच्या सुरवातीच्या पावसात व परतीच्या पावसात विजेचा खूप कडकडाट होतो. ही आकाशातील वीज वीज यंत्रणेकडे आकृष्ट होत असते. त्यामुळे भर पावसात काम करणे आव्हानात्मक असते. कधी कधी हे काम जिवावर बेतू शकते. मात्र अशा प्रकारच्या संकटांना महावितरण कर्मचारी जिद्दीने व चिकाटीने तोंड देत असतात. अशा प्रसंगी वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, अशी भावना वीज कर्मचाऱ्यांची असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 24-05-2025