रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाने श्रीमती रंजना रमाकांत जोशी (वय ६८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) यांच्यावर पायाची कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय क्षेत्रात महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीमतीरंजना रमाकांत जोशी यांना गेल्या १५ वर्षांपासून वातामुळे गुढघेदुखीचा त्रास होता. तसेच दोन्ही पायांना बाक असल्यामुळे उभे राहणे व आधाराशिवाय चालता येणे शक्य नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर यांनी डाव्या पायाची कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली होती. त्यानंतर १७ मे २०२५ रोजी उजव्या पायाचीदेखील कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी रुग्णाला चालणे-फिरणे शक्य झाले. तसेच पायाचा बाक नाहीसा झाल्यामुळे चालणे अगदी सुलभ-सोपे झाले. दोन्ही पायांची किचकट व खर्चिक अशी कृत्रिम सांधेरोपण शस्त्रक्रिया उदय सामंत प्रतिष्ठानच्या सहकार्यामुळे पार पडली.

श्रीमती रंजना जोशी यांनी रुग्णालयात मिळालेल्या योग्य सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निखिल देवकर,भूलतज्ञ डॉ. विनोद कानगुले आणि रुग्णालयातील सर्व कर्मचारी तसेच उदय सामंत प्रतिष्ठानचे महेश सामंत, सागर भिंगारे यांचे मनापासून आभार मानले.

या यशामुळे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय सुविधांची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून सामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना त्यामुळे बळकटी मिळाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 24-05-2025