मंडणगड : मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गांधी चौकातील मराठी शाळेजवळील संरक्षक भिंत गुरुवारी (ता. २२) कोसळली. विशेष म्हणजे या भिंतीचे बांधकाम सहा महिन्यांपूर्वीच केले होते. रात्रीच्या वेळी झालेल्या या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
नगरपंचायतीच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरवणे, तसेच सहाय्य योजना या योजनेच्या माध्यमातून मराठी शाळेजवळ जांभ्या दगडातून संरक्षक भिंतीची निर्मिती करण्यात आली होती. या कामासाठी ६ लाख ४६ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता; मात्र केवळ सहा महिन्यांतच ही भिंत कोसळल्याने भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत येथील रहिवासी नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही.
शाळा सुरू झाल्यावर मुलांना, शाळा व्यवस्थापनास या पडलेल्या भिंतीमुळे त्रास होऊ शकतो. या कामासंदर्भात नगरपंचायतीने योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 24/May/2025














