राजापूर : साखरीनाटे बंदरातील लाखोंची उलाढाल ठप्प

राजापूर : समुद्र किनारपट्टीवर धडकलेले वादळ आणि मॉन्सूनपूर्व पावसाने मासळी हंगामाचा अंतिम टप्पा आर्थिकदृष्ट्या सुखद करण्याची धडपड करणाऱ्या तालुक्यातील साखरीनाटे बंदरातील मच्छीमार बांधवांना निराश केले आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून खवळलेल्या समुद्रातील मासेमारी ठप्प झाल्याने बंदरातील दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. अचानक उद्भवलेल्या वादळामुळे मच्छीमार बांधवांची तारांबळ उडाली आहे.

तालुक्याला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर दिवाळी ते मे महिनाअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात मच्छीमारीचा व्यवसाय चालतो. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या तालुक्यातील नाटे, साखरीनाटे, सागवे, आंबोळगड, जैतापूर, तुळसुंदे आदी गावांतील सुमारे २५०-३०० मच्छीमार या हंगामामध्ये मच्छीमारी करतात. या काळात केल्या जाणाऱ्या मच्छीमारीवर पश्चिम किनारपट्टीतील लोकांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल हंगामामध्ये होते. मासेमारी बंदीकाळ १ जूनपासून लागू होणार आहे.

त्याला काही दिवसांचा कालावधी असल्याने मासळी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हा टप्पा आर्थिकदृष्ट्या सुखद करण्याची मच्छीमारांची लगबग सुरू होती; मात्र आठवडाभर मॉन्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्याच्या जोडीला किनारपट्टीवर वादळही येऊन धडकले आहे. त्यामुळे समुद्र खवळलेला असून, उंच लाटा उसळत असल्याने मासेमारी करणे धोक्याचे बनले आहे. या सगळ्याचा परिणाम साखरीनाटे बंदरावर झाला असून, दरदिवशी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. खवळलेला समुद्र आणि उंच लाटांमुळे समुद्रामध्ये असलेल्या नौका किनाऱ्यावर आणणेही मुश्कील झाले आहे.

१ जूनपासून मासळी हंगाम बंद होणार असल्याने शिल्लक असलेल्या कालावधीमध्ये मासेमारी करण्याचे नियोजन करण्यात आले होते; मात्र, मॉन्सूनपूर्व पाऊस आणि त्याच्या जोडीने येत असलेले वादळ यामुळे समुद्रामध्ये जाणे मुश्कील झाले आहे. एवढेच नव्हे तर समुद्रातून बोटी बाहेर काढणेही मुश्कील झाल्याने पुरती तारांबळ उडाली आहे-अमजद बोरकर, मच्छीमार, राजापूर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 24/May/2025