अकरावी प्रवेश ऑफलाईन पद्धतीने करण्याची मागणी

संगमेश्वर : सध्या राज्यात अकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मे पासून राज्यात ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला प्रारंभ झाला; परंतु अद्याप ही प्रक्रिया वेबसाईटच्या तांत्रिक अडचणीमध्ये अडकली असल्याने तो २५ मे पर्यंत बंद राहील व २६ मेपासून पूर्ववत होईल, असे पुणे येथील शिक्षण संचालनालयातर्फे सांगण्यात येत आहे.

ग्रामीण भागात असलेल्या इंटरनेटच्या अडचणी आणि ऑनलाइन प्रणालीतील ढीगभर भरणा करावयाची माहिती यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमावस्थेत आहेत, विद्यार्थ्यांचा वैयक्तीक ई-मेल आयडी, जातीचा दाखला, पूर्वी शिकत असलेल्या शाळेचा यु डायस नंबर, ऑनलाइन निकालाची प्रिंट अशा अनेक गोष्टी जमवल्यावर असलेला इंटरनेटचा अभाव यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले आहेत.

शासनाने दहावीचे विद्यार्थी वर्गात शिकत असताना पुढील वर्षी अकरावीचा प्रवेश ऑनलाइन होणार असून, विद्यार्थ्यांनी कसे सजग राहावे, याबाबत मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे; पण तसे होत नाही.

शिक्षण संचालनालयाने दहावीच्या निकालाच्या तोंडावर राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती मागवून घाईघाईने अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले आहेत शिवाय शासनाची वेबसाईटदेखील तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. या प्रक्रिया राबवताना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनादेखील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील विविध समस्या लक्षात घेता ऑफलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 24/May/2025