चिपळूण : कोकणात वणवे नैसर्गिकरीत्या लागतात की, जाणीवपूर्वक लावले जात आहेत, याची चौकशी करून आपत्कालीन कायदे लावून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथील पंचायत समितीमध्ये गुहागर व चिपळूण तालुक्याची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. त्यावेळी कोकणात लागणाऱ्या वणव्याचा प्रश्न चर्चेत आला.
चिपळूण गुहागरमध्ये पावसाळ्यात पुराच्या पार्श्वभूमीवर दरडी कोसळण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवा, लोकांची कसल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत मॉन्सूनपूर्वक कार्माचा आढावा घेण्यात आला. दरडी कोसळण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे कुठेही वाहतुकीला अडथळा होणार नाही, पाणी साचणार नाही, पाणीपुरवठा योजनेवर परिणाम होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या. खैर, बांबू लागवडीबाबतच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, चार महिन्यात बांगले काम करा. चार महिन्यानंतर आढावा घेतला जाईल आणि अधिकाऱ्यांचे काम पाहून त्यांचा सत्कार केला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
गेली पंधरा-वीस वर्षे वणव्यामध्ये मोठी हानी होत आहे. वृक्षतोड, भूस्खलन ही कारणे आहेतच; परंतु वणव्यामुळे अधिक वनसंपदा नष्ट होत आहे, असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. बैठकीला आमदार भास्कर जाधव, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गेपाटील, मुख्याधिकारी विशाल भोसले, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, तहसीलदार पाटील आदी उपस्थित होते.
प्रश्न शिष्टाचाराचा
जंगलातील वणवा आणि शिष्टाचार न पाळल्यामुळे संतापाचा वणवा यामुळे मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत वातावरण चांगलेच गरम झाले. आपत्कालीन विषयावरील महत्त्वाच्या बैठकीला आपल्याला निमंत्रण का नाही? मला बोलवू नका, असे पालकमंत्र्यांनी सांगितले का? असे विचारत आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महत्त्वाच्या बैठकांना त्या त्या भागातील स्थानिक आमदारांना बोलवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 24/May/2025














