संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे श्रीकृष्ण उध्दव पाटणकर (वय ७२) यांच्या किराणा दुकानातून १ लाख ८६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही घटना २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींवर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्ण पाटणकर हे त्यांचे किराणा दुकान बंद करत असताना आरोपी विष्णू शांताराम गरव उर्फ नारू गरव (वय ३५, रा. खेरशेत, गरववाडी, ता. चिपळूण) याने तंबाखूची पडी मागितली. पाटणकर यांनी तंबाखूची पडी दिल्यानंतर लाईट बंद करण्यासाठी गेले. त्याचवेळी विष्णू गरव आणि त्याचा साथीदार आशिष जाधव (वय ३८, रा. खेरशेत, जाधववाडी, ता. चिपळूण) यांनी संगनमताने काउंटरवर ठेवलेली १ लाख ८६ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पैसे ठेवण्याची बॅग चोरून नेली. ही चोरी लबाडीच्या आणि बेकायदेशीर हेतूने केल्याचा आरोप आहे.
या घटनेची फिर्याद पाटणकर यांनी २३ मे २०२५ रोजी पहाटे २:२८ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवली. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा तपास केला जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली असून, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 24-05-2025














