लांजा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाची दाणादाण उडाली आहे. अगोदर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असतानाच आता चिखलाबरोबरच संपूर्ण लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या खड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न मुसळधार पावसामुळे पुरता फसला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने लांजा शहरासह तालुक्याला झोडपून काढले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हा लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाला बसला आहे. ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे व उशिरा सुरू झालेल्या कामांचा फटका लांजा शहराला बसत असून, ठिकठिकाणी मुंबई-गोवा महामार्गावर खक्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आधीच रखडलेल्या गटारे, सर्व्हिस रोडच्या कामामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने त्यातून वाट काढणे पादचारी आणि वाहनचालकांसमोर मोठी समस्या निर्माण होत असतानाच आता मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. त्या खड्यांमध्ये पडलेल्या पावसाचे पाणी साचत असून, वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही.
त्यामुळे वाहने या खडयात आपटत आहेत. पादचाऱ्यांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडत आहे. त्याचप्रमाणे सर्विस रोड आणि गटारांच्या कामासाठी खोदलेल्या मात्र अर्धवट स्थितीत असणाऱ्या जागेत पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. एकूणच महामार्ग ठेकेदार कंमनीच्या बेजबाबदार कामाचा फटका लांजा शहरातील नागरिक आणि मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवास वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे.
खड़ी वाहून पुन्हा खड्डेमय
महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यासाठी कंपनीकडून तात्पुरत्या स्वरुपात खडी टाकून हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. असे असले तरी मुसळधारपणे पडणारा पाऊस आणि वाहनांची असलेली सततची रहदारी यामुळे ही खडी वाहून जाऊन रस्ता पुन्हा खड्डेमय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंपनीचा हा प्रयत्न कूचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 24/May/2025














