चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने चिपळूण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसात कुटरे जांभी नदीवरील पुलाच्या बाजूने नदीमधून तात्पुरता भराव केलेला रस्ता वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसला आहे. या पावसामुळे सर्वसामान्यांची कामे रेंगाळली आहेत. चिपळूण शहरात महामार्गावर काहींच्या घरात पाणी शिरल्याचे पाहावयास मिळाले.

चिपळूणमध्ये अल्ताफ नाईक यांच्या घरावर वीज कोसळून घराचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागांत पुलांसह रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये कुटरे येथे सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने नदीत रस्त्यासाठी केलेला भराव वाहून गेला आहे. याचा फटका कुटरे गावातील खालचीपेठ, तांबडवाडी, चिंचवाडी, होडेवाडी, शिर्केवाडी, बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना बसला असून, असुर्डे व सावर्डे येथे जाणेदेखील अवघड झाले आहे. तसेच तळवडे, गोवळ, पाते येथील ग्रामस्थांनादेखील ये-जा करण्याच्यादृष्टीने अडचणीचे झाले आहे.
पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेला रस्ता पावसामुळे नदीतील पाणी वाढल्याने वाहून गेल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे; परंतु आता अडकलेले ग्रामस्थ एकमेकांना हात देऊन सुरक्षितस्थळी जात आहेत.
दरम्यान, सकाळी १२ च्या सुमारास रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू होते. पुलाचे काम पूर्ण झाले आहे; मात्र जोडरस्ता मार्गी लागलेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 24/May/2025














