रोहिणी नक्षत्रापूर्वीच पाऊस; पेरणी रखडली.. धूळवाफेऐवजी चिखल फेरा करण्याची शक्यता

रत्नागिरी : पावसाळ्याची सुरुवात म्हणजे शेतीत लगबग, हे समीकरण यंदा मंडणगड तालुक्यात बदलले आहे. मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली असली तरी, रोहिणी नक्षत्रापूर्वीच सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली आहेत. ही पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांना धूळवाफेऐवजी चिखलपेरा करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साधारणपणे रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली की शेतकरी शेतीपूर्व मशागतीला लागतात. रोहिणी नक्षत्रात पडणारा पाऊस जमिनीला योग्य ओलावा पुरवतो, ज्यामुळे जमिनीत वापसा तयार होऊन बियाणे लवकर आणि व्यवस्थित उगवते. या योग्य वातावरणामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढते, असे मानले जाते. रोहिणी नक्षत्र निघण्यापूर्वी होणारा जोरदार वळवाचा पाऊस शेतीसाठी पोषक असतो; मात्र रोहिणीपूर्वीच सतत पाऊस झाल्यास बियाण्यांसाठी ते चिंतेचे कारण ठरते.

यंदा रोहिणी नक्षत्राला २५ मे पासून सुरुवात होणार आहे; परंतु २० मे पासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी वाट पाहावी लागत आहे. पेरणीची सर्व तयारी असूनही वापसा तयार झाल्यावरच पेरणी करणे योग्य ठरेल, अशी स्थिती आहे. यंदाच्या उष्णतेमुळे चांगला पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांची धारणा असल्याने ते खरीप हंगामासाठी उत्साहात तयारी करत आहेत. बियाण्यांची निवड, शेतीतील अवजारे या कामांमध्ये शेतकरी व्यस्त आहेत. शासनातर्फे मिळणारे बियाणे किंवा स्व-उत्पादित बियाणे यांची निवड शेतकरी करत आहेत.

तालुका कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
मंडणगडचे तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर यांनी सांगितले की, “यंदा पावसाने रोहिणी नक्षत्रापूर्वीच सुरुवात केल्याने पावसाळी वातावरण तयार झाले आहे; मात्र वापसा तयार झाल्यानंतरच पेरणी करणे उचित ठरेल. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून त्याचा लाभ घ्यावा.”

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 24/May/2025