खेड : चोरवणे गावात नव्याने बसवलेला वीज खांब कोसळला

खेड : तालुक्यातील चोरवणे गावात नुकत्याच उभारण्यात आलेल्या थ्री फेज हाय टेन्शन वीज वाहिनीचा खांब पहिल्याच पावसात कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. वीज भारीत तारा जमिनीवर आल्याने गावठाणातील बस स्टॉपपासून ते रामवर्दायनी मंदिर परिसरापर्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या दुर्घटनेने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या वाहिनीचे काम अलीकडेच नव्याने करण्यात आले होते, ज्यामध्ये सिमेंटचे खांब उभे करून थ्री फेज हाय टेन्शन लाईन टाकण्यात आली होती. ग्रामस्थांनी ठेकेदाराला खांबांची मजबूती करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या. परंतु, आर्थिक फायद्यासाठी दर्जाहीन काम केल्याने वादळ नसतानाही या वाहिनीचा खांब आणि वीज तारा कोसळल्या. दुर्घटनास्थळी विजेच्या तारा जमिनीवर कोसळल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच त्याला काळ्या यादीत टाकावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यासोबतच, ग्रामस्थांचे झालेले नुकसान भरून मिळावे आणि वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. दरम्यान, हाय टेन्शन लाईन कोसळल्याने चोरवणे आणि आजूबाजूच्या गावांचा वीज पुरवठा कित्येक तासांपासून पूर्णपणे खंडित झाला आहे. गावकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ योग्य ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 24/May/2025