लांजा : महामार्ग ठेकेदार कंपनीने केलेल्या चुकीच्या कामामुळे लांजा शहरातील कोर्ले फाटा सार्दळ दुकान येथील जमीनीला भेगा पडून ती खचू लागली आहे. त्यामुळे येथील पाच दुकानांसह वीज खांब पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महामार्ग ठेकेदार कंपनीकडून लांजा शहरातील कोर्ले फाटा सार्दळ दुकान या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खोदायी करण्यात आली होती. मात्र सध्या पडणाऱ्या पावसामुळे आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या या कामामुळे सध्या येथील जमीन ही खचू लागली आहे. गुरुवारपासून हा प्रकार सुरू असून आज शुक्रवारी या ठिकाणच्या जमिनींना अधिकच भेगा पडल्या असून जमीन खचू लागल्याने येथील पाच दुकानांना धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या खोदलेल्या ठिकाणी महावितरणचे विज खांब देखील असून जमिनींना पडणाऱ्या मोठमोठ्या भेगा आणि त्यामुळे खचणारी जमीन यामुळे हे वीज खांब देखील पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधीच या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात चिखल पसरला असून त्यात जमिनीला भेगा पडून जमीन खचण्याची प्रकार सुरू झाल्याने ठेकेदाराच्या चुकीबाबत येथील छोटे व्यावसायिक आणि नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळेच ही परिस्थिती उद्भवली असून जमीन खचून याठिकाणचे विजेचे खांब कोसळून गंभीर प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 24/May/2025














