खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून ६ जणांचा हकनाक बळी गेला असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून कुचकामी उपाययोजनांचा अवलंब सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी दुर्घटनेनंतर जगबुडी पुलाच्या अपघात स्थळी उभारलेले गर्डर काही तासातच हटवून तेथे ३ रिकामी पिंप उभी करत खात्याने बेफिरपणाचा कळस केला आहे. यामुळे आणखी बळी हवेत का? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत राष्ट्रीय महामार्ग खात्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंत वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी भोस्ते घाटातील अवघड वळणासह नव्या जगबुडी पुलावरील वळणामुळे अपघाताची मालिका थांबेनाशी झाली आहे. ३ दिवसांपूर्वी घडलेला अपघात ३ वर्षातील मोठा प्राणांतिक अपघात घडल्याने नवा जगबुडी पूल नव्याने चर्चेत आला आहे.
दुर्घटनेनंतरही महामार्ग खात्याने तातडीच्या डागडुजीची जराही तसदी न घेता पुन्हा एकदा उदासीनता दाखवून दिली आहे. भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याने काही तासातच अपघातस्थळी ३ गर्डर बसवले. ही मलमपट्टी टीकेची धनी बनताच काही तासातच अपघातस्थळावरुन गर्डर बाजूला हटवत वळणालगत उभे करत अपघातांचा धोका आणखी वाढवण्याची नवी भर घातली आहे. जगबुडी पुलाच्या अपघाता च्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी चक्क ३ रिकामे पिंप उभे करत केलेली तकलादू उपाययोजना वाहनचालकांसाठी चिंतेची बाब बनली असून त्यांचा जीव टांगणीवर आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 24/May/2025














