Rohini Khadse on Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी; रोहिणी खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Rohini Khadse on Rupali Chakankar : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची (Vaishnavi Hagawane Death Case) सध्या जोरदार चर्चा आहे. सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचे सदस्य असल्याने या प्रकरणाने आता राजकीय वातावरणही तापले आहे. तर हगवणे कुटुंबियांकडून त्यांची मोठी सून मयुरी जगताप हिला देखील मारहाण करण्यात येत होती. मयुरी जगताप हिच्या आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेले सहा महिन्यापूर्वीच पत्र समोर आले. मात्र, महिला आयोगाकडून या पत्राची दखल घेण्यात आली नाही. यावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठत आहे. तर याच प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) आणि रुपाली चाकणकर यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आता रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय.

राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण आल्यास…

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण आल्यास रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रोहिणी खडसे-रुपाली चाकणकर पुन्हा आमने-सामने

दरम्यान, रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर याआधीदेखील जोरदार टीकास्त्र डागले होते. आपल्या महिला आयोगाचा कारभार म्हणजे वराती मागनं घोडं. बरं बाईचा अविर्भाव पण असा की जणू कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहोत. दाल में कुछ काला है.’ असे त्या म्हणाल्या होत्या. तर वैष्णवी हगवणेंच्या जावेने तक्रार दाखल केली होती तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती. रुपाली चाकणकरांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. तर रूपाली चाकणकर यांनी देखील रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. काही विरोधक घटना घडल्यावरच जागे होतात. सोशल मीडिया आणि ट्विटरवर पहिल्या दिवसापासून संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. माझं नाव घेतलं म्हणजे तुमची बातमी झाली, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. आता रोहिणी खडसे यांच्याकडून थेट रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 24-05-2025